कथेचा विषय कसे निवडाल??

लेखन करताना प्रेत्येक टप्पा हा महत्वाचा असतो. जसे की कल्पना, त्यावरचा अभ्यास, कथेचे कथानक, त्यातली भाषा, संवाद, मांडणी. यासगळ्या गोष्टींवर कथेचे यश अवलंबून असते. पण अजून एक गोष्ट यात महत्वाची ठरते ती म्हणजे लेखकानी कथेचा विषय कसा निवडलेला आहे. कथेचा विषय आणि लेखक यांचे समीकरण जुळलेले असेल  तर कथा लेखनाचा मार्ग ही सोपा होतो आणि ती कथा वाचकांना भावते देखील. म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया.

जॉनर

कथेचा विषय किंवा मूड ज्याला आपण जॉनर असे म्हणतो तो नक्की काय आहे आणि काय असावा हे पहिल्यांदा निश्चित करायला हवे. जर आपण एक लेखक आहात तर सर्वप्रथम आपण आपला रस कोणत्या जॉनरच्या कथा लिहीण्यात आहे हे ओळखावे.अथवा स्वतःचे विचारपूर्वक परिक्षण करुन ते ठरवावे..लेखन की एक अंगभूत कला आहे..

कोणीही येऊन चार ओळी खरडून जाव्या आणि स्वतःला लेखक म्हणवून घ्यावे एवढे सोपे नाही ते. एखादा विषय मांडताना आपण त्याचा तळागाळापर्यंत जाऊन अभ्यास करणे गरजेचे असते. बहुतेकांना वाटते की, प्रेमकथा लिहीणे म्हणजे डाव्या हातचा मळ.

पण त्यातही भावना ओताव्या लागतात. त्यामुळे तुमचा हातखंडा असलेला जॉनर कोणता हे शोधायला हवे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लिहायला सुरुवात करता. लेखनाची सुरुवात तुमच्या आवडीच्या, ओळखीच्या आणि सवयीच्या विषयानी झाली की तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि वाचकांचे प्रेमही तुम्हाला मिळते.

आवड

जरी आपली पहिली कथा आपण आपल्याला आवडत्या जॉनरमध्ये लिहिली तरी  आयुष्यभर आपण त्याच प्रकारच्या कथा लिहू असे नाही. वाचकांना आपले लेखन आवडले की त्यांना आपल्याकडून विविध प्रकारचे लिखाण हवे असते, आणि लेखक म्हणून वाचकांच्या त्या अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. त्याशिवाय वेगवेगळे प्रकार आपण लिहिल्यामुळे लेखक म्हणून आपणही समृद्ध होत असतो. त्यामुळे विषयाचा विचार करताना वाचकांना काय हवे आहे, त्यांची पसंती कुठल्या प्रकारच्या गोष्टींना मिळते याचा अभ्यास करून विषय निवडणे हे लेखकांच्या हिताचे असते.  

वातावरण

लेखकाचा कल आणि वाचकांची आवड ह्या दोन गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढीच अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे, तत्कालीन परिस्थिती. आपल्या आजूबाजूला समाजात काय घडते आहे, कुठल्या विषयांची समाजाला निकड आहे, कुठले विषय समाजात घडत आहेत ह्याचाही विचार कथेचा विषय ठरवताना लेखकांनी करायला हवा.

काल्पनिकतेला वास्तवाची जोड देऊन लिहिलेली कथा वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरते. लेखकाला लिहिताना सामाजिक भान जपता येते आणि वाचकांना ही गोष्ट नक्कीच आवडते. त्याशिवाय आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणे, त्याचा अभ्यास करणे यातून अनेकदा लेखकांना असे वेगळे विषय कथांसाठी मिळत जातात जे आजवर कोणी हाताळलेले नाहीत. म्हणजेच यातून लेखकांचाही तितकाच फायदा होतो.

मांडणी

विषय निवडल्यावर त्याच्या मांडणीचा आराखडाही लेखकांनी तयार करायला हवा. त्यावरून आपण त्या विषयाला न्याय देऊ शकू की नाही हा अंदाज लेखकांना येईल. उदाहरणादाखल आपण प्रेमकथा हा विषय घेऊ. आता हा विषय चावून चोथा झालेला म्हणतो तशाप्रकारचा आहे. आजवर अनेकांनी प्रेमकथा लिहून ठेवलेल्या आहेत.

पण तरीही हे तितकेच खरे आहे की आजही नवीन लिहिली गेलेली प्रत्येक प्रेमकथा वाचक आवडीने वाचतात. म्हणजेच प्रेमकथा हा वाचकांच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. मग इथे ही गोष्ट फार महत्वाची ठरते की लेखक म्हणून तुम्ही तुमच्या प्रेमकथेची मांडणी किती वेगळ्या प्रकारे करू शकता.

प्रेमाचे अनेक पैलू जगासमोर मांडावे लागतात. प्रेम म्हणजे एखाद्या मुलाने मुलीला आय लव्ह यू म्हणण्यासारखे नाहीच मुळी. ती एक अनुभूती आहे जी आपल्याला आपल्या लेखणीतून मांडणे गरजेचे आहे.

कसब

लेखक जो विषय निवडेल त्यासाठी त्यांनी पूर्ण कसब वापरून लिखाण मात्र करायला हवे. वर्णनाची शैली ही त्या विषयला धरून आणि उत्तम हवी. कथेतील वातावरण हे विषयाला अनुसरून असावे. एकूणच पात्ररचना आणि इतर घटक हे देखील विषयानुरूप बदलले पाहिजेत.

हे केवळ प्रेमकथेसाठी नाही तर हेच बाकी कथांना देखील लागू पडते. कुठल्याही विषयावर जरी तुम्ही लिहिलेत तरी आपण जे लिहीतोय त्याची छाप वाचकांवर पडली तर आपण वाचनयोग्य लिहीतोय अशी ग्वाही आपल्या मनाला द्यावी.

त्यासाठीच विषयाची निवड करताना हे काही मुद्दे नेहमी लेखकांनी विचारात घ्यायला हवेत. त्याप्रमाणे लेखन केले तर नक्कीच ते वाचकांच्या पसंतीस उतरेल आणि लेखकांनाही आपल्या लिखाणाचे समाधान मिळेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *